राहुलकुमार अवचट
यवत : खामगाव गावच्या हद्दीतील अनमोल ऍग्रो इंडस्ट्रीज या कंपनीच्या परिसरात झालेल्या विचित्र अपघातात कडेठाण येथील तरुणाचा मृत्यू झाला आहे. तुषार नंदराम इंगळे ( वय-३० ) असं या तरुणाचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. १) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, खामगाव येथील कुलमळा जवळ असलेल्या अनमोल ऍग्रो इंडस्ट्रीज या कंपनीच्या परिसरात पाणी बॉटल वाहतूक करणारा एक टेम्पो पाठीमागे येत होता. त्यावेळी तुषार इंगळे व इतर दोन कर्मचारी पायी चालत असताना समोर उभा असलेला दुसरा टेम्पो अचानक पाठीमागे आला. त्यावेळी दोन्ही टेम्पोच्या मध्ये तुषार इंगळे हा तरुण कर्मचारी अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, सायंकाळी सहाच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली असून देखील कंपनी मालक उपस्थित न राहिल्याने तरुणांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. अखेर आज (दि. ०२) सकाळी दहाच्या सुमारास कंपनी मालक उपस्थित राहिल्याने दुपारी २ वाजता तुषार इंगळे याच्यावर कडेठाण येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. तुषार इंगळे या तरुण कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
View this post on Instagram
अंगावर काटा आणणारा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, एक ट्रक मैदानात फिरत होता. त्याचवेळी दुसरा एक ट्रक अचानक रिव्हर्स घेतो. याच दरम्यान तुषार इंगळे हा कामगार व त्याच्या सोबत आणखी दोन कामगार या दोन टेम्पोच्या मध्ये येतात. दोन टेम्पोच्या मध्ये चिरडून तुषारचा मृत्यू झाला आहे. आणखी दोन कामगार सुदैवाने यातून बचावले आहेत. मात्र, तुषारचा जागीच मृत्यू झाला आहे.