पुणे : पुण्यातील शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराजवळ झाडाखाली चहा पीत उभा असलेल्या एका तरुणाच्या डोक्यात अचानक झाडाची फांदी कोसळली. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. अभिजित गुंड (३२, रा. कसबा पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. (Pune Crime News)
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अभिजीत रविवारी सायंकाळी मित्रांसोबत शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराजवळील चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी आला होता. चहा पीत असताना तो मित्रांसोबत निवांत गप्पा मारण्यात गुंग होता. त्यावेळीच अचानक झाडावरून वाळलेली फांदी कोसळून अभिजितच्या डोक्यावर पडली.(Vishrambagh Police station)
या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून अधिक तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.(young man died)
अभिजितच्या मृत्यूला विश्रामबाग क्षेत्रिय कार्यालयाचे अधिकारी जबाबदार
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेच्या उद्यान विभागाकडून धोकादाय फांद्या तोडल्या जातात. मात्र प्रशासनाने या परिसरात दुर्लक्ष केल्यानं अभिजितच्या मृत्यूला विश्रामबाग क्षेत्रिय कार्यालयाचे आणि गार्डन विभागाचे अधिकारी सर्वस्वी जबाबदार आहेत, असा आरोप अभिजितच्या मित्रांनी केला असून सर्व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.(Vishrambagh Regional Office)
३ वर्षांपूर्वी घोले रस्त्यावर झाडाची फांदी पडून अपंग महिलेचा मृत्यू
तीन वर्षांपूर्वी घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाजवळ झाडाची फांदी पडून एका अपंग महिलेचा मृत्यू झाला होता. महिलेच्या नातेवाईकांनी या प्रकरणी पाठपुरावा करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यावेळी महापालिकेच्या उद्यान विभागातील अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.