पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नशेच्या गोळ्या मिळाल्या नाहीत म्हणून तरुणाने स्वच्छतागृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना हिंजवडीतील नित्यानंद व्यसनमुक्ती केंद्रात सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. अनुप लोखंडे (वय-२१, रा. ताडीवाला रस्ता) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुप हा पुणे शहरातील ताडीवाला रस्ता येथे राहण्यास होता. त्या ठिकाणी त्याला नशेच्या गोळ्यांचे व्यसन लागले होते. याच परिसरात राहणाऱ्या आणि दारूचा धंदा करणाऱ्या राजू पवळे यांच्या मुलाकडून अनुप नशेच्या गोळ्या घेत होता. दरम्यान, १ ऑगस्टला अनुप अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यासाठी सारसबाग येथे गेला होता.
तो नशेच्या अवस्थेत दुसऱ्या दिवशी म्हणजे २ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता तेथून घरी आला. मात्र, त्यावेळी त्याच्याकडे त्याची गाडी आणि मोबाइल देखील नव्हता, तो आजपर्यंत मिळालेला नाही. त्यामुळे त्याच्या आईने त्याला त्याच दिवशी हिंजवडी येथील नित्यानंद व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले, मात्र, मंगळवारी पहाटे त्याने बाथरूममध्ये टॉवेलने गळफास घेत आत्महत्या केली.
दरम्यान, अनुपला नशेची सवय लावणाऱ्या त्याच्या मित्रांना आणि नशेच्या गोळ्या देणाऱ्या राजू पवळे याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी अनुपच्या आईने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत केली आहे. याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.