पुणे : पुणे शहरात गुंडांच्या धमकीमुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मंगळवार पेठेतील भीमनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी दोन जणांविरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धार्थ विजय फडतरे (वय-१७, रा. शंकर मंदिरामागे, भीमनगर, मंगळवार पेठ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी सराईत गुन्हेगार रोमियो कांबळे (वय-२७) आणि संकेत कांबळे (वय-२४ दोघे रा. भीमनगर, मंगळवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक देखील करण्यात आली आहे. याबाबत सिद्धार्थची आई अनिता (वय-४०) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी रोमियो आणि संकेत भीमनगर परिसरात राहायला आहेत. दोघांविरुद्ध मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षभरापासून आरोपी सिद्धार्थ याला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याला मारहाण करत होते. प्रतिस्पर्धी टोळीतील मुलांबरोबर राहू नको, अशी धमकी आरोपींनी त्याला दिली होती.
त्यामुळे तो घाबरला होता. आरोपी रोमियो आणि संकेत यांनी ३० मे रोजी रात्री साडेहाच्या सुमारास सिद्धार्थला मंगळवार पेठेतील नागझरी नाल्याजवळ नेऊन त्याला बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीला घाबरून सिद्धार्थने राहत्या घरात ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष शिंदे करत आहेत.