पुणे : पुण्यातील लष्कर परिसरातील मोदीखाना भागात असलेल्या सर्व्हिस सेंटरमध्ये काम करणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी 48 वर्षीय व्यक्तीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.13) संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मोदीखाना परिसरातघडला.
याबाबत 17 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यावरून अशोक बाबाराव खेडेकर (वय-48 रा. कर्वेनगर, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी अकरावी उत्तीर्ण झाली असून सध्या तिला कामाची गरज असल्याने ती नोकरीच्या शोधात होती. लष्कर भागातील आझम कॅम्पसच्या जवळच असलेल्या मोदीखाना परिसरातील एका नामांकित कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये रिसेप्शनीस्ट म्हणून काम करत आहे. तर आरोपी अनेक वर्षापासून त्याच ठिकाणी कामाला आहे. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी रिसेप्शनीस्टच्या ठिकाणी बसली असता आरोपी तिच्या जवळ आला. त्याने घरच्यांबद्दल विचारणा करु लागला.
घरच्यांची चौकशी करत असताना त्याने मुलीसोबत अश्लील चाळे करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच तिला जबरदस्तीने किस केला. तसेच स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. हा प्रकार पीडित मुलीने तिच्या घरच्यांना सांगितला. तिच्या घरच्यांनी लष्कर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास लष्कर पोलीस करत आहेत.