पिंपळे गुरव : पिंपळे गुरव येथून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. दुचाकी घसरून रस्त्यावर पडलेल्या तरुणीच्या डोक्यावरुन पीएमपी बसचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी २० ऑक्टोंबर रोजी नवी सांगवीतील बाबुराव घोलप महाविद्यालयाजवळ रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घटना घडली आहे. अमृता महादेव नाईक (वय-२१, रा. कृष्णा चौक, नवी सांगवी) असे मृत्यु झालेल्या तरुणीचे नाव आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटयार्ड येथून पिंपरीकडे जाणारी ३५४ क्रमांकाची पीएमपी बस औंध, सांगवी, पिंपळे गुरव मार्गे प्रवास करीत होती. त्यावेळी अमृता ही बाबुरावजी घोलप महाविद्यालयाजवळून दुचाकीवरून जात होती. रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या गट्टूवरून तिची दुचाकी घसरली. त्यामुळे, दुचाकीवरील ताबा सुटून ती रस्त्यावर पडली. तसेच तिची दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी कुंपणावर जाऊन आदळली.
याच क्षणी पाठीमागून येणाऱ्या पीएमपी बसच्या डाव्या बाजुकडील मागच्या चाकाखाली अमृता सापडली. बसचे चाक तिच्या डोक्यावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिक आणि सांगवी पोलिसांनी धाव घेतली. तरुणीला तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
दरम्यान, रस्त्यावरील सिमेंटच्या गट्टूमुळे अनेकवेळा अपघात घडल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. नागरिकांकडून ही समस्या महापालिका प्रशासनाने तातडीने सोडविण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीएमपी बसचा चालक आणि वाहकाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.