पुणे : पुण्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. शहरातील कात्रज चौकात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. एसटी बसचा एका दुचाकीला
धक्का लागल्याने दुचाकीवर असलेली तरुणी चाका खाली आली. या घटनेत कोल्हापुरातील तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कात्रज चौकात आज शनिवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
श्वेता चंद्रकांत लीमकर (२५ मुळ रा. कोल्हापूर) असे अपघातात मृत्यु झालेल्या तरुणीचे नाव आहे. MH 14 BT 4856 सांगली -स्वारगेट आणि MH 40 Y 5945 यामधील एका बसचा धक्का तरुणीच्या दुचाकीला लागल्याने तरुणी दुसऱ्या बसच्या चाकाखाली आल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला.
खेड शिवापुर येथील एका कंपनीत ती नोकरीला होती, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तसेच वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून अधिकचा तपास सुरू आहे.