पुणे : पुण्यात ब्रेकअप केल्याने तरुणीला शिवीगाळ करुन धमकी दिल्याची घटना घडली आहे. इन्स्टाग्रामच्या ओळखीतून मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र, तरुणाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समजल्यानंतर तरुणीने त्याच्यासोबतचे संबंध तोडले. याचा राग आल्याने आरोपीने मुलीला आणि तिच्या घरच्यांना फोन करुन वारंवार शिवीगाळ करुन धमकी दिली.
याप्रकरणी वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत घडला आहे.यापाराकारणी 20 वर्षाच्या तरुणीने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अर्जुन राठोड (रा. शिवनेरी नगर, कोंढवा, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी या दोघांची ओळख नोव्हेंबर 2023 मध्ये इन्स्टाग्रामवर झाली होती. त्यांच्यात मैत्री होऊन मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. मात्र, आरोपी अर्जुन हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर गुन्हे दाखल असल्याची माहिती फिर्यादी तरुणीला समजले. त्यामुळे तरुणीने त्याच्या सोबत असलेले प्रेमसंबंध तोडले.
याचा राग मनात धरून आरोपीने तरुणीला आणि तिच्या घरच्यांना फोन करुन वारंवार लग्नाची मागणी करुन त्रास दिला. तसेच लग्न केले नाही तर बघून घेईन अशी धमकी देत शिवीगाळ केली. या त्रासाला कंटाळून तरुणीने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून तरुणावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार प्रशांत ठाकरे करत आहेत.