बारामती : शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी आज पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकावले आहे. आज झालेल्या बैठकीत त्यांनी अजित पवार यांच्यासह शरद पवार यांच्यावर देखील जहरी टीका केली. माझी लढाई पवारांविरोधात आहे. मी जंकण्यासाठीच लढत आहे. काही लोक गैरसमज पसरवत आहेत, की मला फक्त अजित पवार यांना हरवायचे आहे, मी शरद पवार यांचा माणूस आहे. मात्र, असा नालायकपणा मी कधीच करणार नाही. अजित पवारांनी शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या तेव्हा तुम्ही गप्प राहिला. शरद पवार यांना देखील हे माहित आहे. या रावणाचा वध करण्यासाठी बापू ठाम आहे, असे सांगत शिवतारे यांनी घणाघात केला.
विजय शिवतारे म्हणाले की, ही लढाई खूप मोठी आहे. सुनील तटकरे म्हणतात की शिवतारांचे स्क्रिप्ट कोण लिहून देतो त्याचा आम्ही शोधत आहोत. तुम्ही शोध घेऊ नका, मीच तुम्हाला सांगतो. माझी लढाई दोन्ही पवारांविरोधात आहे. ग्रामीण दहशतवाद शरद पवारांनी केला. माझ्या माणसांना त्रास दिला. अजित पवारांनीही खूप पापे केली आहेत. यांच्यामुळेच अख्ख्या राज्याला ग्रामीण दहशतवाद शब्द माहिती पडला. गेल्या ७० वर्षांत त्यांनी फक्त घुसखोरी केली आहे. या रावणाचा वध करायचा आहे.
पूर्वी ईस्ट इंडिया कंपनी होती. ती गेली आणि आता पवारांची कंपनी आली आहे. अजित पवार आणि शरद पवार म्हणजे एक राक्षस आणि दुसरा ब्रह्मराक्षस आहेत. दोघांचा खात्मा करून ग्रामीण दहशतवाद संपवायचा आहे, असेही विजय शिवतारे यांनी सांगितले.