पुणे : पुणे महापालिकेच्या मलनिस्सारण विभागात ठेका मिळविण्याच्या वादातून भाजपच्या कार्यकर्त्यावर रिव्हॉल्वर रोखून त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शहरातील गंज पेठ परिसरात रविवारी २१ जुलै रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पालिकेच्या मलनिस्सारण विभागातील कनिष्ठ अभियंता आणि त्याच्या भावाविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत भाजपचे कार्यकर्ते निर्मल मोतीलाल हरिहर (वय-३६, रा. मंगल क्लब मित्र मंडळाजवळ, गंज पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून कनिष्ठ अभियंता गणेश राजेंद्र गिते (वय-३७) आणि त्याचा भाऊ महेश (वय-३५, दोघे रा. किराड गल्ली, भवानी पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खडक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भाजप कार्यकर्ते निर्मल हरिहर हे महापालिकेत ठेकेदार आहेत. हरिहर हे बालेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या कार्यकारिणी बैठकीला निघाले होते. त्यावेळी ते गंज पेठेतील मंगल क्लब मित्र मंडळाशेजारी उभे होते.
त्यावेळी हरिहर यांच्या ओळखीतील महापालिकेच्या मलनिस्सारण विभागातील कनिष्ठ अभियंता गणेश गिते आणि त्याचा भाऊ महेश त्या ठिकाणी आले. आरोपी गिते यांनी हरिहर यांच्या पोटाला बंदूक लावून जातीवाचक शिवीगाळ केली. ‘तू दहा कोटी रुपयांचे टेंडर भरतो काय? तुझी लायकी काय?’ असं म्हणत हरिहर यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास खडक पोलीस करत आहेत.