पुणे : पुण्यातून एक बातमी समोर आली आहे. किरकोळ वादातून येरवडा कारागृहातील कैद्याला दोघांनी बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना १४ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास येरवडा कारागृहात घडली आहे. या बेदम मारहाणीत एक कैदी गंभीर जखमी झाला आहे. सुधीर गौतम थोरात असे जखमी झालेल्या कैद्याचे नाव आहे. येरवडा कारागृहातील कैद्यांमधील वाद तसेच कैदी पळून जाण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत.
या प्रकरणी कारागृहातील रक्षक विश्वास वाकडे (वय-४३) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दोन कैद्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैदी विकी उर्फ विवेक राजेश खराडे, अली अदम शेख अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नावे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहातील बराकीत शनिवारी दुपारी कैदी सुधीर थोरात याला विकी खराडे आणि अली शेख यांनी अडवले. त्यावेळी ते म्हणाले तू ‘कारागृहातून कधी सुटणार?’, अशी विचारणा केली. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. वादानंतर खराडे आणि शेख यांनी थोरात याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
दरम्यान, या बेदम मारहाणीत थोरातची बरगडी, तसेच नाकाला गंभीर दुखापत झाली. कारागृहात हाणामारी झाल्याचे समजताच कारागृह रक्षकांनी त्वरीत तेथे धाव घेतली. थोरातला तातडीने रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर प्रथमोपाचार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र शेळके, गुन्हे शाखेच्या निरीक्षक पल्लवी मेहेर यांनी कारागृहास भेट दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विशाल टकले करीत आहेत.