राहुलकुमार अवचट
यवत : दरवर्षीप्रमाणे आषाढ महिन्यातील रविवारी दौंड तालुक्यातील यवत गाव हे पूर्णपणे बंद ठेवण्यात येते. यावर्षी देखील रविवार दि. २१ जुलै रोजी वनभोजनासाठी यवत गाव हे संपूर्ण बंद राहणार असून यवत येथील ग्रामस्थ पारंपरिक पद्धतीने संपूर्ण गाव बंद ठेवून गावच्या शिवेबाहेर वनभोजनासाठी जात असतात.
या जुन्या परंपरेप्रमाने उद्या सकाळी यवत गावातील सर्व ग्रामस्थ ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व ग्रामदेवी श्री महालक्ष्मी मातेला नैवेद्य व नारळ फोडून आपआपली घरे व दैनंदिन व्यवहार बंद ठेवतात. याप्रथेप्रमाणे सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत तर काही दुकाने दिवसभर बंद राहणार आहेत. उद्या यवत गाव हे पूर्णपणे बंद राहणार असून गावात कोणीही दुचाकी अथवा चार चाकी वाहने घेऊन फिरू नये, असे आवाहन यवत ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.