राहुलकुमार अवचट
यवत : संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होत असून, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या राजकीयदृष्ट्या महत्वाच्या गावांमध्ये यवत पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले.
यवत पोलिसांच्या वतीने मंगळवारी सायंकाळी पाच ते रात्री आठवाजेपर्यंत पथसंचलन केले गेले. निवडणूक प्रक्रियेत कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता निर्भय व शांततामय वातावरणात निवडणूक पार पडावी, यासाठी दौंड तालुक्यातील पश्चिम भागातील यवत, केडगाव, वरखंड, पाटस या राजकीयदृष्ट्या संवेदनशील व महत्वाचे ‘अ’ वर्ग गावामध्ये पोलिसांचे पथसंचलन घेण्यात आले.
या पथ संचलनास १ पोलीस निरीक्षक, १ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ४ पोलीस उपनिरीक्षक, २० पोलीस अंमलदार व ३४ सीआयएसएफ कंपनीचे अंमलदार सहभागी होते. हे पथसंचलन पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, बारामती विभाग अपर पोलीस अधिक्षक संजय जाधव, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली यवत पोलिस ठाण्याकडून करण्यात आले.