राहुलकुमार अवचट
यवत : यवत पोलिसांची नांदूर येथील हातभट्टी चालकांवर कारवाई करून १ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली. नांदूर गावच्या हद्दीतील पवार ॲग्रोजवळ असलेल्या ओढ्याच्या कडेला विषारी गावठी हातभट्टी दारू गाळण्याचे काम चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीवरून यवत पोलीस पथकाने नांदुर येथे सदर ठिकाणी छापा टाकला असता नागकन्या केरा संगोडीया (वय ५७) व युवराज केरा संगोडीया (रा. खामगाव, शेलारवाडी, ता. दौंड, जि.पुणे) हे दोघेजण गावठी हातभट्टी घालण्याचे काम करताना आढळून आले. त्यांच्याकडून ३ हजार ५०० लिटरचे कच्चे रसायन, १४० लिटर तयार दारू गावठी व इतर साहित्य असा एकूण १ लाख ९७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
यावेळी नागकन्या केरा संगोडीया हिला पोलीस पथकाने ताब्यात घेतले असून, युवराज केरा संगोडीया हा पोलिसांची चाहूल लागताच पळून गेला. नागकन्या केरा संगोडीया व युवराज केरा संगोडीया या दोघांविरोधात यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.
दरम्यान, ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभाग अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके, पोलीस हवालदार निलेश कदम, रामदास जगताप, महिला पोलीस हवालदार सोनल शिंदे यांच्या पथकाने केली.