Yawat News : यवत : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनाला गालबोट लागले आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी यवत बंदची हाक देण्यात आली होती. यवत परिसरातील व्यापारी वर्गाने बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
विविध संघटनांच्या वतीने निषेध मोर्चाला पाठिंबा
अंतरवली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केले असून, याला मराठा समाजाचा मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळाला. परंतु पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करत लाठीचार्ज केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रकार राज्यभरात पोचला. याचे पडसाद उमटायला सुरवात झाली झाले. या घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजाने बंदची हाक दिली होती. सकाळपासूनच यवत परिसरातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. सकाळी दहाच्या सुमारास सकल समाज एकत्र येत श्री काळभैरवनाथ मंदिरापासून सरकार विरोधात घोषणा देत व झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत यवत गावातून निषेध मोर्चा काढण्यात आला. या वेळी मोर्चेकरांनी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग काही काळ रोखून धरत निषेध व्यक्त केला. सकाळी अकराच्या सुमारास मोर्चाचे पुन्हा श्री काळभैरवनाथ मंदिर परिसरात आगमन झाले.
यवत गाव व परिसरात सर्वत्र कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. बंदमध्ये सहभागी होण्यासाठी सकाळपासून मराठा समाज रस्त्यावर उतरलेला दिसून येत होता. मोर्चाच्या सांगतास्थळी निषेध व्यक्त करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुस्लिम बांधवांबरोबरच वंचित बहुजन आघाडी, झोपडपट्टी सुरक्षा दल, अखिल मातंग समाज यांसह विविध संघटनांच्या वतीने निषेध मोर्चाला पाठिंबा देण्यात आला.
या वेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते उत्तमराव गायकवाड, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष दत्ता डाडर, शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख श्रीपती दोरगे, शिवसेना अध्यक्ष अशोक दोरगे, काँग्रेस पक्षाचे अरविंद दोरगे, व्यापारी महेश दोरगे, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, माझी पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड, उपसरपंच सुभाष यादव आदी मान्यवरांनी झालेल्या घटनेचा निषेध नोंदवत मोर्चाला पाठिंबा व्यक्त केला. या वेळी यवतचे सरपंच समीर दोरगे, युवा नेते गणेश शेळके, मयूर दोरगे, आबा दोरगे, दादा माने, ग्रामपंचायत सदस्य इम्रान तांबोळी, गौरव दोरगे, सुरज चोरगे, किरण यादव यांसह मोठ्या प्रमाणात तरुण व ग्रामस्थ उपस्थित होते.