Yawat News : यवत, ता.२६ : यवत येथील दोरगेवाडी अंगणवाडी केंद्रात सही पोषण देश रोषन कार्यक्रम संपन्न झाला आहे. सही पोषण देश रोषन हा कार्यक्रम दरवर्षी १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर हा पोषण मास दरवर्षी साजरा करण्यात येतो. या कालावधीत राष्ट्रीय पोषण अभियानाअंतर्गत दरदिवशी पोषण आहाराबाबत जनजागृतीपर विविध कार्यक्रम राबवले जात आहे.
पोषण आहाराबाबत जनजागृतीपर विविध कार्यक्रम
यावर्षी अंगणवाडी केंद्र दोरगेवाडी येथील पालक संगिता गणपत पाखरे यांच्या घरी गौरीगणपती स्थापना करण्यात आली होती. या निमित्ताने गौरीना अंगणवाडीत “सही पोषण देश रोशन ” माध्यमातून गुलाबी व पिवळ्या रंगाच्या साड्या गौरींना नेसवण्यात आल्या. पोषण आहाराचे फलक लावून गौरीची सजावट करण्यात आली. तसेच पटांगणात देखील “सही पोषण देश रोषन” विषयी रांगोळी काढून पालेभाज्या व फळभाज्यांनी सजावट करण्यात आली.
अंगणवाडी सेविका संध्या रविंद्र शिंदे व मनिषा राजाराम गायकवाड यांनी अंगणवाडीतील मुला मुलींसह गौरी व गणपतीची आरती केली. समृद्धी शरद गरड या चिमुकलीने पालेभाज्यांचे व फळांचे महत्व सांगितले. यावेळी शुभांगी दोरगे, प्राची दोरगे, सायली दोरगे यांनी आकर्षक रांगोळी रेखाटली होती. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या शितल दोरगे, संगीता दोरगे , वैभवी दोरगे यांसह दोरगेवाडी अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व परिसरातील महिला व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, येत्या ३० सप्टेंबरपर्यंत दररोज ही जनजागृती केली जाणार असून, पोषण अभियान यादरम्यान गृहभेटी देणे, परसबाग तयार करणे, कुपोषित बालकांना भेटी देणे, महिला बचत गटाची सभा घेणे, सुदृढ बालक स्पर्धा घेणे, माता समितीची सभा घेणे, मुलींच्या जन्माचे वृक्षारोपण करून स्वागत करणे, गरोदर स्तनदा महिलांना समुपदेशन करणे, किशोरी मुलींना आहार व आरोग्य विषयक माहिती देणे, कोरोना प्रतिबंधक लसीकरनाचे महत्त्व, तसेच सार्वजनिक ठिकाणी पथनाट्याद्वारे पोषण महिनानिमित्त विविध कार्यक्रम घेऊन व गृहभेटी देऊन जनजागृती करण्यात येणार आहे.