जीवन शेंडगे
Yawat News : यवत : आजच्या माहिती तंत्रज्ञान युगात नवनवीन शैक्षणिक माहिती, व्हिडीओ उपलब्ध होण्यासाठी विनाअडथळा इंटरनेट सुविधेची गरजेची असते. ग्रामीण भागातील शाळेत ही सुविधा न मिळाल्यामुळे या शाळांतील विद्यार्थी नवनवीन माहितीपासून कायमच वंचित राहतात. आपल्या गावचे विद्यार्थी यापासून वंचित राहू नयेत व त्यांची महत्त्वपूर्ण गरज पूर्ण व्हावी, या उद्देशाने डाळिंब ग्रामपंचायत सदस्या बबई नामदेव म्हस्के यांचे चिरंजीव संतोष नामदेव म्हस्के यांनी डाळिंब प्राथमिक शाळेसाठी कायमस्वरूपी मोफत व अमर्यादित वायफाय इंटरनेट जोडणीची सुविधा आज प्रदान केली.
इंटरनेट जोडणीची सुविधा आज प्रदान
या जोडणीसाठीची सर्व उपकरणे आज त्यांनी शाळेकडे सुपूर्द केली व सुविधाही सुरू केली. वायफाय इंटरनेट सुविधा संतोष म्हस्के यांच्या परिवारातर्फे कायमस्वरूपी मोफत व अमर्यादित डेटासह उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वायफाय सुविधेमुळे डाळिंब शाळेतील इंटरनेटची आवश्यकता असणारे सर्व दृक-श्राव्य शैक्षणिक साहित्य व उपकरणे कोणताही अडथळा न येता सतत कार्यान्वित राहण्यास महत्त्वपूर्ण मदत होणार आहे. विद्यार्थ्यांना जगातील नवनवीन शैक्षणिक घडामोडी त्वरित समजणार आहेत.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश म्हस्के, संतोष म्हस्के, यश दरेकर, मुख्याध्यापक रवींद्र जाधव, शिक्षिका मनिषा कुंजीर, अनिता भोसले, कल्पना काटे, मनीषा मोहिते, दीपक कदम, छाया शेंडकर,आशा कोलते आदी उपस्थित होते.