Yawat : लग्नामध्ये स्टेजवरून खाली उतरण्याच्या वादातून एका 65 वर्षीय महिलेला लाकडी काठीने बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. देऊळगाव गाडा (ता. दौंड) येथे रविवारी (ता. 05) सकाळी लग्नात साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना हि घटना घडली.

नवनाथ साहेबराव मोरे, शुभ नवनाथ मोरे, साहेबराव पांडुरंग मोरे (सर्व रा. देऊळगाव गाडा, ता. दौंड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी लिता दिगंबर मोरे (वय-65, रा. नारायण बेट, देऊळगाव गाडा, ता. दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ललिता मोरे रविवारी सकाळी आपल्या मुलासह (सोमनाथ) पुतण्याच्या मुलीच्या लग्नासाठी गेल्या होत्या. लग्नात साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना नवनाथ मोरे याने सोमनाथला स्टेजवरून खाली उतरण्यास सांगितले. यावेळी ललिता मोरे यांनी मध्यस्थी करत “गेल्या वर्षी आंबेडकर जयंतीलाही तू माझ्या मुलाला शिव्या दिल्या होत्या, आता पुन्हा का शिव्या देतोस?” असा जाब विचारला. याचा राग धरून वादाला सुरुवात झाली.
ललिता मोरे यांनी जाब विचारताच नवनाथ मोरे यांचा मुलगा शुभ मोरे याने “तुमचे काय कारण आहे मला बोलण्याचे?” असे म्हणत त्यांना हाताने धक्काबुक्की केली. इतकेच नव्हे तर शुभ याने आपल्या हातातील लाकडी काठीने ललिता मोरे यांच्या पाठीवर जोरात प्रहार केला. यावेळी साहेबराव पांडुरंग मोरे यानेही अश्लील शिवीगाळ करत दमदाटी केली. अखेर नातेवाईकांनी मध्यस्थी करून हे भांडण सोडवले.
ललिता मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यवत पोलीस ठाणे (अंकित पाटस चौकी) येथे भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार गुन्हा (रजि. नं. ३२२/२०२६) दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार मड्डी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.







