उरुळी कांचन: यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटस (ता. दौंड) येथील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. पवन ऊर्फ मारूती विष्णु पोळेकर (वय २४, रा. अंबिकानगर, पाटस, ता. दौंड ) असे स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोळेकर हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोळेकरवर यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटस व आसपासच्या भागात संगणमत करून जबरी चोरी करणे, जबरी चोरी करताना जबर मारहाण करणे, अवैधरित्या गौण खनिजाची वाहतुक करणे, स्त्रीयांचा विनयभंग करणे, घातक हत्यारांचा वापर करून चोरांची टोळी तयार करणे, यासारखे मागील दहा महिन्यांत बारा गुन्हे दाखल होते.
यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांना प्रस्ताव दिला होता. त्याच्या विरुद्ध आलेले प्रस्ताव आणि सर्व कागदपत्रांची पडताळणी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी करून या कायद्यानुसार पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे एका वर्षासाठी स्थानबध्दतेचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, यवत पोलिसांनी बुधवारी (ता. ०१) आरोपी पोळेकर याला ताब्यात घेऊन त्यास येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे दाखल करून एक वर्षाकरीता स्थानबध्दतेची कारवाई केलेली आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, आकाश शेळके, पोलीस हवालदार महेश बनकर, राजु मोमीन, अतुल डेरे, निलेश कदम, गुरू गायकवाड, राम जगताप, महेंद्र चांदणे, अक्षय यादव, सोनल शिंदे, नुतन जाधव, ढोपरे, सुजीत जगताप यांनी केलेली आहे.