यवत : गावठी हातभट्टीची वाहतूक करणाऱ्या एकावर यवत पोलिसांनी कारवाई केली असून, त्याच्याकडून ४ लाख ३६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला.
यवत पोलिसांना एक व्यक्ती भांडगाव येथून सोलापूर-पुणे महामार्गावरून छोटा हत्ती (एम.एच.१२व्ही.टी.२६९४) मधून गावठी हातभट्टी दारू वाहतूक करणार असल्याची माहिती यवत पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे, यवत पोलिसांच्या पथकाने सापळा रचून सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर पुण्याच्या दिशेने जात असताना कासुर्डी गावच्या हद्दीतील टोलनाका येथे राहुल देवानंद कुंभार (वय ३२, रा.सर्वे नं.३ हिलटॉप सोसायटी, दाक्षा बंगलो, गोविंदराव पाटीलनगर, धनकवडी, पुणे) यास गाडीसह ताब्यात घेतले.
त्यावेळी या वाहनात २१ कँडमध्ये सुमारे ७३५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू वाहतूक करताना आढळून आला. यावेळी वाहनासह एकूण ४,३६,७५० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीविरोधात यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभाग अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राम जगताप, महेंद्र चांदणे, मेघराज जगताप, अक्षय यादव यांच्या पथकाने केली.