गणेश सूळ
केडगाव, (पुणे) : यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, कार्यकर्ते, गाव पोलीस पाटील, पत्रकारांसह यवत पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये यवत पोलीस स्टेशन हद्दीतील गावनिहाय पोलीस पाटील व पत्रकारांसह सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्याकडून गावनिहाय सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांचे अध्यक्ष कार्यकर्त्यांना महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक गणेश मंडळाने गणेश मूर्ती स्थापनेची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. जेणेकरून मंडळाची नोंद पोलीस स्टेशन येथे राहिल. गावातील मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत. मात्र, नागरिकांना त्रासदायक होईल, असा स्पीकरचा आवाज वाढवू नये.
गणपती शेडमध्ये इलेक्ट्रिक वीज सुरक्षित राहण्यासाठी महावितरण विभागाची परवानगी घेऊन वीज कनेक्शन जोडून घ्यावे, वरिष्ठ अधिकारी यांच्या सूचनेनुसार प्रत्येक गाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून मूर्ती विसर्जन ठिकाणी रात्रीच्या वेळी सर्वत्र लाईट लावण्याची व्यवस्था सरपंच, उपसरपंच यांनी करून घ्यावी. सार्वजनिक गणेश महोत्सव व्यवस्थित पार पडावा या दृष्टीने पोलीस पाटील व पत्रकार यांनी या बैठकीत मांडलेल्या महत्त्वाच्या विषयावर पोलीस प्रशासनाचे लक्ष राहील, असे मत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी व्यक्त केले.
सार्वजनिक गणेश महोत्सवाच्या निमित्ताने मंडळांनी केलेल्या आकर्षित देखाव्यांचे प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या जेष्ठ नागरिक भाविकांना व महिला, मुला – मुलींना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वत:ला सुरक्षारक्षक समजुन त्यांची सुरक्षतेची दखल घ्यावी. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन भुरट्या चोरट्यांपासून महिलांचे संरक्षण करावे. एखादा कोणी भुरटाचोर निदर्शनास आल्यास जमावाने मारहाण न करता पोलिसांच्या ताब्यात द्यावे, सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळांनी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मद्यपान घेऊन लेझीम खेळणाऱ्या व हुल्लडबाजी करणाऱ्याची गय केली जाणार नाही.
अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीबद्दल शिफारस करू नये. गणेश महोत्सवाच्या निमित्ताने भावनेच्या भरात कोणाच्या मोबाईल, व्हॉट्सअप फेसबुकवर दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे आक्षेपार्ह फोटो किंवा मेसेज आढळून आल्यास प्रतिक्रिया व्यक्त न करता पोलीस प्रशासनाला खबर द्यावी, योग्य कारवाई केली जाईल.
तसेच मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीत पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून डीजेच्या ध्वनी आवाजाची तीव्रता इलेक्ट्रिक साह्याने घेण्यात येणार असल्याचे संकेत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिले आहेत. गणपती शेडमध्ये कुठलाही अनुचित प्रकार दिसल्यास मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्त्यांवर धडक कायदेशीर कारवाई केली जाईल. अशी सक्तीची ताकीद पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी उपस्थित मंडळाच्या अध्यक्ष कार्यकर्त्यांना दिली.
दरम्यान, यावेळी यवत पोलीस स्टेशन येथे नव्याने आलेले सहायक पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, आकाश शेळके यांनी उपस्थित मंडळाच्या अध्यक्ष, कार्यकर्त्यांची ओळख करून दिली. तसेच साहाय्यक पोलीस आकाश शेळके यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. गावनिहाय गणेश मंडळाच्या ठिकाणी एक पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात येणार असल्याचे पोलीस पोलिस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी यावेळी सांगितले.