जीवन शेंडकर
Yavat News : यवत : आषाढ महिन्यातील कामिका एकादशीच्या पुण्यपर्वदिनी प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डाळिंब (ता.दौंड) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डाळिंब व लालवाडी शाळेतील ज्ञानपंढरीच्या बालवारकऱ्यांचा पालखी दिंडी सोहळा विठूमाऊलीच्या गजरात, भक्तिमय व उत्साही वातावरणात उत्साहात संपन्न झाला. ‘शाळा हीच आमुची पंढरी’ ही भावना मनात ठेवून या बालवारकऱ्यांचा दिंडी सोहळा ग्रामप्रदक्षिणा करून श्रीक्षेत्र विठ्ठल बन येथील श्री विठ्ठल मंदिरात मजल दरमजल करीत व संतांचे अभंग आळवीत दुपारी पोहोचला.
बालवारकऱ्यांचा पालखी दिंडी सोहळा
पालखीपुढे ग्रामस्थ भजनी मंडळ, तुळशीवाले, पारंपारिक वारकरी पोशाखात कलश, हंडे, विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती घेतलेल्या मुली, पताकावाले, झेंडेकरी, विणेकरी या पारंपारिक क्रमाने रांगेत व शिस्तबद्ध रीतीने बाल वारकऱ्यांच्या सोहळ्याने आपली वाटचाल विठ्ठल मंदिरापर्यंत केली. (Yavat News) संतरचित अभंगाबरोबरच ‘आम्ही वारकरी ज्ञान पंढरीचे’, ‘आम्हा लागला लळा गुणवत्तेचा’, ‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला’, ‘शाळेत माझ्या स्वच्छतेचा जागर’, ‘झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण वाचवा’, अशा बालवारकऱ्यांच्या घोषणांनी डाळिंब गावचा पवित्र परिसर दुमदुमून गेला.
डाळिंब परिसर आज बालवारकऱ्यांच्या विठू नामाच्या गजराने भक्तीरसात चिंब न्हाऊन निघाला. पालखी सोहळ्यात मुले विठ्ठल रुक्मिणी, वारकरी संतांच्या व पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले. (Yavat News) ग्रामस्थांनी घरापुढे आकर्षक रांगोळ्या काढून, पालखीचे दर्शन घेऊन, वारकऱ्यांचे पाद्यपूजन करून मार्गावर पालखीचे स्वागत केले.
संतांचे अभंग आळवीत डाळिंब गावच्या मुख्य चौकात सोहळा पोहोचला येथे रिंगणाचा सोहळा संपन्न झाला. रिंगण सोहळ्यात आकर्षण ठरले ते शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य बाळासाहेब गायकवाड यांच्या मेंढ्यांनी पालखी भोवती घातलेले रिंगण. रिंगण सोहळ्यात ज्ञानोबा तुकारामाचा गजर टिपेला पोहोचला. (Yavat News) ग्रामस्थ, महिला, मुले व युवक यांनी रिंगणानंतर फुगड्या खेळून वारीचा आनंद लुटला. या दिंडीत गुणवत्तेचा, पर्यावरण रक्षणाचा व स्वच्छतेचा जागर करण्यात आला.
पोहोचअभंग व आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. बालवारकऱ्यांना आशुतोष जरांडे, अक्षय म्हस्के व दादा बोरकर यांनी फराळाचे वाटप केले. दिंडी सोहळ्याचे आयोजन मुख्याध्यापक रवींद्र जाधव, स्वाती कुंजीर, मनिषा कुंजीर, अनिता भोसले, कल्पना काटे, मनीषा मोहिते, छाया शेंडकर, दीपक कदम, राजाभाऊ कांबळे व आशा म्हस्के यांनी केले.
शाळा व्यवस्थापन समिती डाळिंब लालवाडी व समस्त ग्रामस्थ डाळींब यांनी पालखी सोहळ्यास रोख रकमेचे बक्षीस देऊन बालवारकऱ्यांचे कौतुक केले.