राहुलकुमार अवचट
यवत, (पुणे) : येथील श्री महालक्ष्मी माता नवरात्र उत्सव ट्रस्टच्या वतीने नवरात्रीतील सातव्या माळेनिमित्त महालक्ष्मी मंदिर येथे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या स्पर्धेत १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
श्री महालक्ष्मी माता नवरात्र उत्सव ट्रस्टच्या वतीने महालक्ष्मी माता नवरात्र उत्सव २०२३ आयोजित करण्यात आला आहे. सातव्या माळेनिमित्त बालवाडी – नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांना तयार चित्रे नवीन यासाठी देण्यात आली होती तर पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना विषय देण्यात आले होते यावेळी अनेक विद्यार्थी चित्र काढण्यात दंग झाले होते.
दरम्यान, यावेळी मंदिर परिसरात सातव्या माळेनिमित्त नेत्रदिपक दीपोत्सव साजरा करण्यात आला. हजारो दिव्यांच्या प्रकाशात संपूर्ण मंदिर परिसर उजाळून निघाला होता. यावेळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांनीही दिवे लावण्यासाठी सहभाग घेतला. तसेच चित्रकला स्पर्धेचा निकाल रात्री उशिरा लागला.