राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : पंढरीची वारी… टाळ-मृदुंगाचा गजर… घुंगरांचा छनछनाट यासोबतच फक्कड लावणी आणि भक्तीगीतांचा मिलाफ असा अनोखा नजराणा आज जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांनी याची देही, याची डोळा अनुभवला. कला आणि भक्तीच्या अनोख्या संगमात आज केडगाव-चौफुला बहरुन गेला.
केडगावच्या अंबिका कला केंद्रातील नृत्यांगनांची वारकऱ्यांसाठी आगळी भेट
जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पहिला मुक्काम आटोपून यवतहून वरवंडच्या दिशेने पंढरपुरकडे रवाना झाला. (Yavat News) पायी वारी सोहळ्यात वारकऱ्यांच्या सेवेसाठी कुणी अन्नदान करतं, कुणी उपयुक्त वस्तूंचे वाटप करचं. मात्र, वाखरी गावच्या हद्दीतील वाकडा पूल, केडगाव येथील अंबिका कला केंद्राच्या नृत्यांगनांनी वारकऱ्यांसाठी आपली कला सादर करून, विठ्ठल-रुक्मिणी चरणी आपली सेवा पोहचविली. वारकऱ्यांसाठी ही एक आगळी भेट ठरली.
नृत्यांगणांनी विठुरायाच्या भक्ती गीतांवर ताल धरला. सोबतच लावणीही सादर करत जुगलबंदीचा एक नजराणा वारकऱ्यांसाठी सादर केला. या जुगलबंदीला वारकऱ्यांनी टाळ्या वाजवत मोठ्या उत्साहात दाद दिली. वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा मोह देखील कला केंद्रातील नृत्यांगनांना आवरला नाही. (Yavat News) या वेळी सर्व नृत्यांगनांनी फुगड्या खेळून वारीचा मनमुराद आनंद घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून या कलाकेंद्राच्या नृत्यांगना वारकऱ्यांसाठी आपली कला सादर करतात. डॉ. अशोक जाधव व जयश्री जाधव त्यांनी आजही ही परंपरा कायम जपली आहे.
पालखीच्या स्वागताचे हे ३१ सावे वर्ष असून, १० हजार वारकऱ्यांना येथे प्रसादाचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती न्यू अंबिका कला केंद्राचे मालक डॉ. अशोक जाधव व संचालिका जयश्री आक्का जाधव यांनी दिली. (Yavat News) या वेळी वैशाली वाफळेकर, संगीता काळे, स्वाती साळुंखे, पायल जाधव, रागिणी वडगावकर, पायल मणेगावकर , प्रिया नगरकर, दूर्गा नगरकर, पायल जाधव यांसह कला केंद्रातील अनेक नृत्यांगना उपस्थित होत्या.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : यवतचे सरपंच समीर दोरगे यांना मातृशोक