पुणे : पुण्यातील कर्वेरस्ता आणि शास्त्री रस्त्याला जोडणारा, तसेच फक्त दुचाकी वाहनांसाठी असलेला मुठा नदीवरील यशवंतराव चव्हाण उड्डाणपूल (पूना हॉस्पिटल शेजारील) धोकादायक झाला आहे. पुणे महापालिकेने या पुलाचे ऑडिट केले होते. यामध्ये स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये या पुलाचे बेअरिंग आणि एक्सपान्शन जॉइंट बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी हा पूल २ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दुचाकी वाहनांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन महापालिका, तसेच वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज पुलांवरून काही वर्षांपूर्वी दुचाकी वाहनांना बंदी करण्यात आली होती. त्यावेळी फक्त दुचाकी वाहनांसाठी हा फूल होता, तसेच त्यावर चारचाकी वाहनांना बंदी होती. मात्र, गेल्या काही वर्षांत या पुलाचा वापर चारचाकी वाहनेही करत आहेत. त्यामुळे पुलाच्या बेअरिंग खराब झाल्या आहेत.
असा असेल पर्यायी मार्ग
- शास्त्री रस्त्यावरून कर्वेनगरकडे जाणाऱ्या वाहनांनी गांजवे चौक येथून टिळक चौक-छत्रपती संभाजी महाराज पूल (लकडी पूल) खंडोजीबाबा चौकाच्या मार्गाचा वापर करावा.
- कर्वे रस्त्यावरून आलेल्या वाहनांनी खंडोजीबाबा चौक छत्रपती संभाजी महाराज पुलावरून टिळक चौकातून इच्छित स्थळी जावे.