लोणी काळभोर, (पुणे) : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखाना गेल्या चौदा वर्षांपासून बंद आहे. कारखाना सुरू होणार की नाही? हा मोठा प्रश्न सर्वसामान्य शेतकरी सभासदांच्या पुढे आ वासून उभा आहे. अशातच साखर कारखान्याची 117 एकर जमीन विक्री करण्याचा प्रस्ताव कारखान्याने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला पत्राद्वारे दिला आहे. परंतु, या प्रस्तावास काही संचालकांनी विरोध केला असून, नव्याने वार्षिक सभा घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये, अशी भूमिका घेतली आहे.
कारखान्याच्या मालकीच्या 251 एकरांपैकी 117 एकर जमीन खरेदी करा, असा प्रस्ताव अध्यक्ष सुभाष जगताप यांनी पुणे कृषी उत्पन्न समितीसमोर ठेवला आहे. पुणे कृषी उत्पन्न समितीला उपबाजार विकसित करण्यासाठी कार्यक्षेत्रात जमिनीची आवश्यकता आहे, असे समजल्याने आणि कारखान्यावरील विविध बँकांचे, वित्तीय संस्थांचे कर्ज फेडण्यासाठी व भांडवल उभारणीसाठी हा प्रस्ताव देण्यात आला आहे.
यशवंत सहकारी कारखान्याची निवडणूक गेल्या मार्च महिन्यात पार पडली आणि नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आले. मात्र, निवडणूक होऊन सहा महिने झाले, तरी कारखाना सुरु होण्याचे प्रयत्न कुठेही दिसत नाही. अध्यक्ष मात्र स्वतःच्या मर्जीने निर्णय घेत आहे, अशी तक्रार काही संचालकांनी केली असून सध्या जमीन विक्रीवरून गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. सध्याच्या स्थितीत कारखान्यावर 149 कोटी रुपये कर्ज आहे. त्यामुळे वन टाईम सेटलमेंट (ओटीएस) केल्यावर हे कर्ज कमी होऊ शकते.
घेतलेल्या कर्जाच्या बदल्यात कारखान्याची मालमत्ता तारण आहे. सर्व वित्तीय संस्थाची देणी देऊन कारखाना सुरु करण्यासाठी कारखान्याची अतिरिक्त असलेली सुमारे 121 एकर जमीन विक्री करण्याचा ठराव कारखान्याच्या 11 सप्टेंबर 2012 रोजीच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर जमीन विक्री प्रस्तावास महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने 22 मार्च 2012 रोजी मंजुरी देखील दिली होती. याच पत्राचा आणि ठरावाचा आधार घेत जमीन विक्रीचा प्रस्ताव दिल्याचे समोर आले आहे.
21 हजार सभासद, 1200 कामगारांच्या स्वप्नावर पाणी
तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार व आमदारांनी यशवंत सहकारी साखर कारखाना आहे, त्याच ठिकाणी सुरू करणार अशी घोषणा गेल्या 13 वर्षांत अनेकवेळा केली; परंतु तो अद्याप सुरू न झाल्याने सुमारे 21 हजार शेतकरी सभासद व 1200 कामगार यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. त्यातच आता कारखान्याची जमीन विक्री करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सभासद व कामगारांच्या भावना तीव्र झाल्या आहेत.
याबाबत बोलताना यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप म्हणाले की, “बँकेच्या कर्जाचे हप्ते, शेतकऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे पैसे देणे बाकी आहे. ‘ओटीएस’मध्ये बँकेचे कर्ज मिटविण्याचा प्रयत्न करत आहोत. ओटीएस केले, तर 110 कोटींमध्ये कारखाना वाचेल. जर, ओटीएस केलं नाही आणि ओटीएस करून पैसे भरले नाहीत, तर मात्र बँक कारखान्याच्या जमिनीचा लिलाव करेल. प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे अशा आशयाच्या बातम्या दिल्या जात आहेत. संचालक मंडळाच्या मासिक सभेत हा विषय झालेला असून कोणीही विरोध केला नाही. संचालकांनी उगीच आव आणू नये. तसेच चुकीची माहिती पसरवू नये. राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी सहकार्य करावे, असं देखील जगताप यांनी म्हटलं आहे.
2012 मध्ये प्रशासकांनी घेतलेल्या वार्षिक सभेमध्ये जमीन विक्रीचा ठराव मंजूर झालेला होता. 117 एकर जमीन विकण्यापेक्षा जेवढी गरज असेल, तेवढीच जमीन विकावी. नवीन सर्वसाधारण सभा घेऊनच निर्णय घ्यावा, अशी आम्हा संचालक मंडळाची भूमिका आहे. तसेच, साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा लिलाव करणे बंधनकारक आहे. पण, या नियमांना अध्यक्षांनी केराची टोपली दाखवली आहे.
-शामराव कोतवाल, संचालक यशवंत सहकारी साखर कारखाना, थेऊर, (ता. हवेली)