पुणे : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची 99.27 एकर जमीन खरेदी करण्याचा प्रस्ताव पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने पणन संचालकांकडे दिला आहे. या जागेची किंमत सुमारे 335 कोटी रुपये असून, दोन्ही संस्थांच्या संचालक मंडळाने व शासनाच्या मान्यतेने कमी किमतीने उपबाजार आवारासाठी जमीन खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारासाठी जमीन खरेदी करण्याकरिता महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनयमन) अधिनियम 1963 मधील कलम 12 (1) नुसार मंजुरी मिळण्यासाठीचा प्रस्ताव 18 नोव्हेंबरला पणन संचालनालयास दिलेला आहे. सध्या शेतकर्यांना व बाजार घटकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीस जागेची आवश्यकता आहे. त्यामुळे बाजार समितीने शिवाजीराव भोसले सहकारी बँकेकडून मौजे कोरेगांव मूळ (ता.हवेली, जि. पुणे) येथील 12 एकर जमीन 53 कोटी 17 लाख 88 हजार 704 रुपयांना 7 ऑक्टोबर 2022 रोजी खरेदी केलेली आहे.
दरम्यान, या खरेदी केलेल्या जमिनीला जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) यांनी 5 जुलै 2024 रोजीच्या अधिसूचनेन्वये दुय्यम उपबाजार आवार घोषित केलेला आहे. त्यातच थेऊरमधील जागा खरेदीसाठी निधी उपलब्धता व्हावी म्हणून कोरेगाव मूळ येथील उपबाजाराची जागा जाहीर लिलावाने पणन संचालकांच्या कलम 12 (1) अन्वये परवानगी घेऊन विक्री करणे. तसेच राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेऊन यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमीन खरेदी करण्याबाबतचा निर्णय बाजार समितीने बहुमताने घेतल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे.
यशवंत कारखान्याच्या संचालक मंडळाने कारखान्याची देणी देणे व भांडवल उभारणीसाठी स्वमालकीची 99.27 एकर जमीन एकूण 400 कोटी एवढ्या रकमेस विक्री करण्याचा प्रस्ताव पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीस 30 ऑक्टोबर 2024 रोजी दिला होता.
जमा ठेवीची मुदत 22 डिसेंबरला संपणार
ओव्हर ड्राफ्टवर कर्ज घेतलेल्या जमा ठेवीची मुदत 22 डिसेंबर 2024 अखेर संपत असून, शिल्लक ओव्हरड्राफ्ट कर्ज रक्कम 32 कोटी 31 लाख 2 हजार 787 जमा ठेवी रकमेत समायोजित केल्यास बाजार समितीकडे 135 कोटी 48 लाख 28 हजार 399 इतक्या रकमेच्या ठेवी शिल्लक राहणार असल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे.
बाजार समितीकडे 167 कोटींच्या ठेवी शिल्लक
थेऊर येथील जमीन खरेदीसाठी बाजार समितीकडे नोव्हेंबर महिनाअखेर एकूण 167 कोटी 79 लाख 31 हजार 186 रुपये इतक्या रकमेच्या जमा ठेवी आहेत. मौजे कोरेगाव मूळ येथील जमीन खरेदीकरतेवेळी जमा ठेवीच्या रकमेवर ओव्हरड्राफ्ट (ओडी) कर्ज घेतलेले आहे. या कर्जापैकी उर्वरित कर्ज 32 कोटी 31 लाख दोन हजार 787 रुपये इतके शिल्लक आहे.
गेल्या काही वर्षांपासून यशवंत कारखाना बंद असल्याने त्याची यंत्रसामग्री खराब झालेली आहे. बँका व कामगारांची देणी कारखान्याला द्यायची आहेत. कारखाना सुरु करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची गरज लागणार असून, त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडून (एनसीडीसी) मदत मिळविण्याचे काम देखील सुरु आहे. त्याचबरोबर बँकेकडून कर्ज अथवा कारखान्याच्या जागेची विक्री करून तो सुरु करण्यासाठी चाचपणी केली जात आहे. यासाठी आम्ही शिरूर-हवेलीचे विद्यमान आमदार माऊली कटके यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करत आहोत. जो काही निर्णय असेल, तो संचालकांच्या बैठकीत घेतला जाईल.
– मोरेश्वर काळे, उपाध्यक्ष, यशवंत सहकारी साखर कारखाना, थेऊर. ता. हवेली.