लोणी काळभोर (पुणे) : संचालक मंडळाच्या चुकीच्या कारभारामुळे मागील तेरा वर्षापासून बंद पडलेला “यशवंत” सहकारी साखर कारखाना पुन्हा एकदा सुरु करत हवेली व दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना पुनरुज्जीवीत करण्याचा अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचा खरा प्रयत्न राहणार आहे. कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमच्या बाजुने सर्वोतोपरी प्रयत्न केले. मात्र, विरोधकांनी जिरवाजिरवीचे राजकारण केल्याने ही निवडणुक लागली आहे. कारखाना कोणी बंद पाडला, याची जाणीव सभासदांना असल्याने या निवडणुकीत मतदार अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला विजयी करतील, असा विश्वास हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक प्रकाश जगताप यांनी थेऊर (ता. हवेली) येथे व्यक्त केला.
कारखान्याची सत्ता मिळवण्यासाठी विरोधक कोणत्याही थराला जाऊ शकतात. कारखान्याचे मतदार सुज्ञ असून त्यांना विरोधकांची पुर्ण माहिती आहे. “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी”चे सर्व उमेदवार कारखान्याच्या व शेतकऱ्याच्या हितासाठी निपक्षपणे काम करतील अशी आम्ही ग्वाही देतो. सभासदांनी आमच्यावर विश्वास ठेवत येत्या नऊ तारखेला “कपबशी” या चिन्हावर शिक्का मारून आमच्या वीसही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहनही प्रकाश जगताप यांनी केले.
“यशवंत”च्या संचालक मंडळाची निवडणुक येत्या नऊ मार्च रोजी होत असून कारखान्यावर सत्ता मिळवण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप अण्णा गायकवाड, प्रकाश जगताप, विद्यमान संचालक प्रशांत काळभोर व कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखालील “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी”ने वीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. थेऊर येथे चिंतामणी गणपतीला नारळ वाढवून आज प्रचाराचा शुभारंभ झाला, तेव्हा वरील विश्वास जगताप यांनी केला
यावेळी व्यासपीठावर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक विकास दांगट, राष्टवादी कॉग्रेस (शरद पवार गट) चे तालुका अध्यक्ष संदीप गोते, माजी जिल्हा परीषद सदस्य रामदास दाभाडे, लक्ष्मण केसकर, कामगार नेते तात्यासाहेब काळे, मांजरीचे माजी सरपंच शिवराज घुले, कदमवाकवस्तीचे माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड, सोरतापवाडीचे माजी सरपंच सागर चौधरी, रणजित गायकवाड, जितेंद्र बडेकर, सचिन मचाले, प्रकाश हरपळे, संजय सातव, राजेश काळभोर, मिलिंद काळभोर, अश्विनी कांचन, सीमा कांचन आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रशांत काळभोर म्हणाले, संपुर्ण राज्यात नावलौकिक असणारा कारखाना तेरा वर्षापुर्वी तत्कालीन पदाधिकारी व काही संचालकांच्या चुकीच्या कारभारामुळे बंद पडला. संचालक मंडळातील काहींनी कारखाना व शेतकरी हितापेक्षा स्वतःच्या हिताला प्राधान्य दिल्यानेच कारखाना बंद पडला हे वास्तव आहे. त्यांच्या चुकीच्या कारभामुळे कारख्यान्याचे वीस हजाराहून अधिक ऊस उत्पादक शेतकरी व कारखान्याचे कामगार देशोधडीला लागले आहेत. आपल्या भ्रष्ट कारभाराने तेरा वर्षांपूर्वी कारखाना बंद पाडणारी मंडळी पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी एकत्र आली आहेत. मात्र, सभासद खूप हुशार आहेत. कारखाना बंद पाडणाऱ्यांच्या तोंडावर कोणी बोलत नसले, तरी उद्याच्या निवडणुकीत कारखान्याचे सभासद त्यांना त्यांची योग्य जागा निश्चित दाखवतील, असा विश्वासही काळभोर यांनी व्यक्त केला.
विरोधक खुल्या मनाचे नाहीत, म्हणुनच निवडणुक लागली..
यावेळी विरोधकांच्या भुमिकेबद्दल बोलताना प्रकाश जगताप म्हणाले, निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून मागील एक महिन्यांपासून आम्ही खुल्या मनाने समोरच्या पॅनेल प्रमुखांशी अनेक वेळा चर्चा केली. मागील तेरा वर्षे झोपलेली मंडळी आता कारखाना सुरू करण्याचे नाटक करत आहेत. निवडणुक बिनविरोध व्हावी म्हणून समोरच्या पॅनेल प्रमुखांना अनेक वेगवेगळे प्रस्ताव दिले. मात्र, जिरवाजिरवीचे राजकारण करणाऱ्यांनी एकही प्रस्ताव मान्य केला नाही. त्यामुळे ही निवडणुक लागली असल्याचा आरोप प्रकाश जगताप यांनी यावेळी केला.
हिरामण काकडे यांचा शेतकरी विकास आघाडीला पाठींबा..
यावेळी हवेली पंचायत समितीचे सदस्य हिरामण काकडे यांनी “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी”ला पाठींबा जाहीर केला. यावेळी आपली भुमिका स्पष्ट करतना हिरामण काकडे म्हणाले, यशवंतची निवडणुक बिनविरोध व्हावी व बंद असलेला कारखाना पुन्हा सुरु व्हावा, ही भुमिका घेऊन संचालक मंडळाची निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला होता. हीच भुमिका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप अण्णा गायकवाड, प्रकाश जगताप, विद्यमान संचालक प्रशांत काळभोर व कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखालील “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी”ची असल्याने, या निवडणुकीतुन माघार घेण्याबरोबरच आघाडीला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. सभासदांनीही कारखाना सुरु करणाऱ्यांच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहनही हिरामण काकडे यांनी यावेळी केले.
दरम्यान, यावेळी कुंजीरवाडीचे माजी सरपंच संतोष कुंजीर, शिंदवने गावचे माजी सरपंच अण्णासाहेब महाडीकसह शामल पवार, जितेंद्र बडेकर, संजय सातव, पोपट गायकवाड, अण्णासाहेब काळभोर, शंकर हरपळे, तेजस जवळकर यांनी देखील आपली भूमिका मांडली.