युनूस तांबोळी
शिरूर(पुणे) : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचलनालय पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल वाडिया पार्क अहमदनगर येथे ३ ते ४ जानेवारी २०२४ रोजी राज्यस्तरीय शालेय कुराश कुस्ती स्पर्धा झाल्या. मलठण (ता. शिरूर) येथील यश गणेश जामदार याने पुणे विभागाचे नेतृत्व करत कोल्हापूर, मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर येथील मल्लांचा पराभव केला.
अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत ५५ किलो वजनी गटांमध्ये सुवर्णपदक पटकावले असून नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय कुराश कुस्ती स्पर्धेसाठी त्याची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.
शिरूर तालुक्यातील मलठण येथील यश जामदार हा गेल्या पाच वर्षापासून कुस्ती स्पर्धेचा सराव करत आहे. परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊली, विश्वात्मक जंगली महाराज कुस्ती केंद्र, कोकमठाण (शिर्डी ) येथे गुरुवर्य वस्ताद पै. भरत नायकल (सर) यांच्या मार्गदर्शनाखाली दैनंदिन सराव करत कुस्तीचे धडे गिरवत आहे.
एकाच वर्षात दोन राष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची किमया करत यश ने एक इतिहास रचला आहे. जून महिन्यातच यश ने जम्मू-काश्मीर येथे झालेल्या राष्ट्रीय कुमार कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. पुन्हा एकदा यशची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे, या यशामुळे परिसरातून त्याचे कौतूक केले जात आहे.