शिक्रापूर: दहिवडी (ता. शिरूर) येथील मांजरे वस्ती येथे २१ जून रोजी यश शरद गायकवाड या दहा वर्षीय बालकाचा उसाच्या शेतात मृतदेह मिळून आला होता. त्या वेळी बिबट्याने बालकाला शेतात नेल्याची अफवा पसरली. त्यानंतर वनविभाग २० दिवसांपासून बिबट्याचा शोध घेण्यासाठी कामाला लागलेले असताना अखेर सदर बालकाचा मृत्यू डोक्याला मार लागल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे.
मांजरेवस्ती येथे २१ जून रोजी २०२४ यश गायकवाड हा दुपारच्या सुमारास घराच्या पाठीमागे शौचास गेलेला होता. त्यांनतर बराच वेळ तो दिसून न आल्याने घरच्यांसह नागरिकांनी त्याचा शोध घेतला. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास यशचा मृतदेह उसाच्या शेतात मिळून आला. या वेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता कोठेही बिबट्याच्या पावलाचे ठसे मिळून आले नाही. यशच्या शरीरावर आढळून आलेल्या जखमा संशयास्पद वाटून आल्याने खळबळ उडाली. यशच्या मृत्यूचे नेमके कारण मिळवण्यासाठी मृतदेहाचे शवविच्छेदन ससून मध्ये करण्यात आले. त्यांनतर जुन्नर वनविभागाचे उपवन संरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे, शिरुर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप, माणिकडोह बिबट निवारण केंद्राचे प्रमुख डॉ. महेंद्र ढोरे आदींनी घटनास्थळी पाहणी केली.
पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे आदींनी भेट देवून पाहणी करत श्वान पथकाला देखील पाचारण केले. बिबट्याचे ठसे ही आढळून आले नाहीत. त्यामुळे बालकाच्या मृत्यूचे गूढ वाढले. मात्र, यशचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झालेला असून डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल दिला आहे.
दरम्यान, दहिवडी येथील बालकाच्या मृत्यूचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून त्याबाबतचा व्हीसेरा राखून ठेवलेला आहे. डोक्याला मार कशामुळे लागला ही माहिती मिळावी अशी मागणी आम्ही ससूनकडे केली असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली.