पुणे : प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत तब्बल तीन वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या पैलवान विजय चौधरी यांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. कुस्तीच्या आखाड्यानंतर आता राजकारणाचा आखाडा गाजवण्याच्या तयारीत असल्याची माहिती विजय चौधरी यांनी दिली. चौधरी लोकसभा निवणूक लढवणार असल्याचे कळताच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
विजय चौधरी हे एक भारतीय कुस्तीपटू आणि तीन वेळा सर्वांत प्रतिष्ठित महाराष्ट्र केसरी विजेते आहेत. त्यांनी २०१४, २०१५ आणि २०१६ मध्ये सलग तीनदा हा पुरस्कार जिंकला. नरसिंग यादवनंतर हा पराक्रम करणारे ते दुसरे कुस्तीपटू ठरले. २०१९ मध्ये झी महाराष्ट्र कुस्ती लीगच्या स्टार जडित उद्घाटन सीझनमध्ये पुणेरी पलटणला विजय मिळवून देण्यातही त्यांचे नेतृत्व कामी आले.
भारतीय जनता पक्ष आपला आवडता पक्ष आहे. त्या पक्षाकडून संधी मिळाल्यास लोकसभा निवडणूक लढण्यास तयार असल्याचे चौधरी यांनी सांगितले. विजय चौधरी हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील रहिवाशी आहेत. चाळीसगाव तालुक्यातील सायगाव हे त्यांचे गाव आहे. यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात जर संधी मिळाली तर नक्कीच निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, जळगाव लोकसभेत सध्या भाजपचे उन्मेष पाटील खासदार आहेत. भाजप उन्मेष पाटील यांना पर्याय शोधत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. यामुळे विजय चौधरी जळगाव लोकसभा मतदार संघातून लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी जळगाव लोकसभा मतदारसंघातून प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. परंतु ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, चौधरी सध्या पुणे पोलीस दलात कार्यरत आहेत. वाहतूक शाखेचे उपअधीक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. आतापर्यंत पोलीस खात्यात राहून त्यांनी जनतेची सेवा केली, आता राजकारणात येऊन जनतेची सेवा करायची आहे, असे विजय चौधरी यांनी सांगितले.