लोणी काळभोर : येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमध्ये संविधान दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह भारतीय संविधानाच्या ग्रंथाचे व संविधान उद्देशिकेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य सीताराम गवळी अध्यक्षस्थानी होते. तर पर्यवेक्षिका रेखा पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि पाचवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी उपस्थित होते.
या वेळी ओंकार काळे, वेदांत सोनार, अभय राठोड या विद्यार्थ्यांसह शिक्षक सोमनाथ दळवी यांनी मनोगतातून हुतात्म्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. संविधान निर्माण करण्यापासूनची माहिती व संविधानाचे महत्त्व त्यांनी आपल्या मनोगतामधून उलगडले.
अध्यक्षीय भाषणात विद्यालयाचे प्राचार्य सीताराम गवळी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारताच्या घटना परिषदेने अथक परिश्रम घेऊन देशाची राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली. बरोबर दोन महिन्यांनी २६ जानेवारी १९५० पासून त्याची देशामध्ये अंमलबजावणी सुरू झाली. २६ नोव्हेंबर हा संविधान दिन उत्साहात साजरा करून लोकशाही संपन्न करू या, असे आवाहन विद्यार्थी व शिक्षकांना केले.
कार्यक्रमामध्ये संविधानाचे वाचन व सूत्रसंचालन कल्पना बोरकर यांनी केले. ज्येष्ठ क्रीडा शिक्षक सुरेश कोरे यांनी संविधानाची प्रतिज्ञा घेतली. पराग होलमुखे यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले.