पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मेसमधील जेवणात यापूर्वी अळी, झुरळे, प्लास्टीक, केस या गोष्टी सापडल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. आता ९ मार्च रोजी सकाळी पुन्हा एकदा मुलींच्या मेसमध्ये एका विद्यार्थिनीच्या पोह्यांमध्ये अळी तर उपीटमध्ये केस आढळल्याने विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मेसमधील जेवणात वारंवार अळी, झुरळे, केस अशा गोष्टी आढळत आहेत. अशा घटना घडल्यानंतर सर्व विद्यार्थी संघटना याविरोधात आवाज उठवतात. त्यानंतर संबंधित मेसचालक बदलला जातो. नवीन माणूस येतो. परंतु जेवणाचा दर्जा मात्र सुधारत नाही. आमची विद्यापीठ प्रशासनास नम्र विनंती आहे की, त्यांनी या प्रश्नावर कायमस्वरूपी मार्ग काढावा, अन्यथा असे निकृष्ट दर्जाचे जेवण खाऊन विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी विद्यापीठ प्रशासन जबाबदार असेल, असे विद्यापीठ भोजनगृह गुणवत्ता नियंत्रण समितीचे सदस्य राहुल ससाणे यांनी सांगितले.
दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने प्राध्यापकांचा समावेश असलेली उपहारगृह व भोजनगृह दक्षता समिती तसेच विद्यार्थ्यांचा समावेश असलेली भोजनगृह गुणवत्ता नियंत्रण समिती अशा दोन समित्या या सर्व प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गठीत केल्या आहेत. या समितीमधील विद्यार्थी प्रतिनिधी भोजनगृहाला भेटी देतात. जेवणाचा दर्जा तपासतात; परंतु प्राध्यापकांमधून अध्यक्ष वगळता इतर किती सदस्य मेसला भेटी देतात, असा सवाल ससाणे यांनी उपस्थित केला आहे.