लोणी काळभोर : : कुंजीरवाडी (ता. हवेली) श्रीनाथ शेती भांडारात काम करणाऱ्या व्यवस्थापकाने कोट्यवधींचा अपहार केल्याचे उघडकीला आले आहे. संबंधित व्यवस्थापकाने ग्राहकांकडून घेतलेले तब्बल १ कोटी २९ लाख रुपयांचे पेमेंट स्वतःच्या पत्नीच्या नावावर असलेल्या बँक खात्यावर जमा करुन घेतले. तसेच या रकमेचा अपहार केला. या प्रकरणी कामगारावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत संदीप सुखराज धुमाळ (वय-५४, रा. कुंजीरवाडी) यांनी मंगळवारी (ता. १९) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून विकास रामराव धोंगते (वय-४२, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०२३ पूर्वी वेळोवेळी घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कुंजीरवाडी येथे श्रीनाथ शेती भांडार नावाचे दुकान आहे. तिथे आरोपी विकास हा मागील २४ वर्षांपासून कृषी केंद्र व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. विकास याने ग्राहकांना दुकानातील कृषी उपयोगी बी-बियाण्याचा माल ग्राहकांना विक्री केला. त्याने ग्राहकांना विक्री केलेल्या मालाचे १ कोटी २९ लाख १० हजार ४४० रुपयांपेक्षा जास्त रक्कम दुकानाच्या बँक खात्यावर जमा केले नाही. तर आरोपीने ग्राहकांकडून घेतलेली रोख रक्कम पत्नीच्या व नर्सरीच्या नावावर असलेल्या बँक खात्यात जमा करुन घेतली. त्याने पैशांचा अपहार करुन फिर्यादींकडील कामाला सो़डचिठ्ठी दिली आणि पळून गेला.
दरम्यान, कामगार पळाल्यानंतर फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. गोंगते हा रविवारी (ता. २९) हडपसर येथून फरार झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके करीत आहेत.