-प्रदिप रासकर
निमगाव भोगी : रामलिंग गावच्या हद्दीतील गट नं. 25 ग्रीन पार्क हॉटेलच्या पाठीमागे लॅन्ड डेव्हलपर्सच्या ऑफिसचे बांधकाम सुरु होते. त्यादरम्यान कोणतीही काळजी न घेता तसेच महावितरणाची परवानगी न घेता हाय होल्टेजच्या तारेच्या खाली सेंट्रीगचे काम सुरु असताना शॉक लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
राधेश्याम महेशप्रसाद चौरासिया (वय 46) असे मृत कामगाराचे नाव आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार (दि.30 सप्टेंबर) राधेश्याम चौरासिया हे सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास रामलिंग रोडवरील साईटवर सेंट्रींगच्या कामावर गेले होते. दुपारी 4.15 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा सुधीर चौरासिया (वय 24) हा शिरुर येथे जेनेरिक मेडीकल येथे असताना त्याला ओळखीचे अनिल घावटे यांचा फोन आला व त्यावेळी त्यांनी सांगितले की, तुझे वडील राधेश्याम चौरासिया (वय 46) यांना बांधकामाच्या साईटवर असताना इलेक्ट्रिक लाईटचा शॉक लागला आहे.
तेव्हा लगेच रामलिंग येथे वडीलांचे काम चालु असलेल्या ठिकाणी मुलगा सुधीर हा गेला असता. त्याला त्याचे वडील तेथे बेशुध्द अवस्थेत पडलेले दिसले. त्यानंतर तेथे जमलेल्या लोकांच्या मदतीने मुलाने वडिलांना उपचारकामी शिरुर ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता तेथील डॉक्टरांनी राधेश्याम चौरसिया यांना तपासुन ते उपचारापुर्वीच मयत झाल्याचे घोषित केले. याबाबत सुधीर चौरसिया यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत गिरी हे करत आहे.
बांधकाम व्यावसायिकाचा आतातायीपणा नडला….?
सदर डेव्हलपर्सने पोल व तारा शिफ्टिंग साठी महावितरणकडे अर्ज केला होता. परंतु त्याबाबतचे काम प्रलंबित होते. त्यामुळे परवानगी न घेता पोल व तारा शिष्ट न करता डेव्हलपर्सने काम सुरु केल्याचे शिरुर महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव यांनी सांगितले आहे. हाय होल्टेजच्या ताराखाली असे धोकादायकरीत्या काम केल्यामुळे हा अनर्थ घडला आहे. त्यामुळे आता महावितरण विभाग आणि शिरुर पोलीस स्टेशन यावर काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.