पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन लिफ्टच्या मोकळया डक्ट मध्ये पडून कामगाराचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. ही घटना येवलेवाडी येथील पिरॅमिड कन्स्ट्रक्शन येथे २४ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सनी केशरीनारायन सोनी (वय-१९, रा. लेबर कॉलनी, येवलेवाडी) असे मृत्यु झालेल्या कामगार तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी त्याचे वडिल केशरीनारायन सोनी (वय-४१, रा. बलरामपूर, उत्तर प्रदेश) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन डॉ. दिनेशकुमार रामसमुज द्विवेदी (वय-३७, रा. पॅरामिड आशियाना, इनामदारनगर, येवलेवाडी, कोंढवा) असे गुन्हा दाखल केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिरॅमिड कन्स्ट्रक्शनचे येवलेवाडी येथे बांधकाम सुरु आहे. त्याठिकाणी सोनी यांचे कुटुंबिय कामगार म्हणून कामाला आहेत. डॉ. दिनेशकुमार द्विवेदी याच्या हाताखाली सनी काम करत होता. ठेकेदाराने कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाय योजना केल्या नाहीत.
दरम्यान, सनी सोनी हा इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन लिफ्टच्या मोकळया डक्टमधून खाली पडून त्याचा मृत्यु झाला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जाधव करीत आहेत़