पुणे : पुण्यात सराफी पेढीतील कामगाराने साडेनऊ लाख रुपयांचे सोने चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवार पेठेतील सराफ बाजारात घडली आहे. याप्रकरणी रिजाबूल शहा ऊर्फ साफिक शेख (२८, रा. वर्धमान, पश्चिम बंगाल) याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत साबीर सुकुर मलिक (३६, रा. नाना पेठ) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साबीर शेख यांचा पुण्यातील रविवार पेठेतील सराफ बाजारात दागिने घडविण्याचा व्यवसाय आहे. आरोपी रिजाबूल शहा त्यांच्याकडे कामाला होता. शहाने मलिक यांचे लक्ष नसल्याची संधी साधून ९ लाख ५९ हजार रुपयांचे सोने चोरून नेले. सोन्याची लगड चोरून शहा पसार झाला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मलिक यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. सहायक पोलिस निरीक्षक वैभव गायकवाड अधिक तपास करीत आहेत.