पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (PMRDA) जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांत दळणवळण सुलभ करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. हिंजवडी आणि पिरंगुट औद्योगिक क्षेत्रांतील प्रत्येकी तीन अशा एकूण सहा रस्त्यांच्या कामांना अखेर सुरुवात झाली आहे. या रस्त्यांच्या उभारणीनंतर स्थानिक नागरिक आणि औद्योगिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या कामांसाठी सन २०२५-२६ च्या आर्थिक वर्षात पीएमआरडीएकडून एकूण २०३.७८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि पीएमआरडीएचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत ४५०३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. या अर्थसंकल्पात शहर आणि ग्रामीण भागांतील दळणवळण व्यवस्था सुधारण्यावर भर देण्यात आला होता.

सुरू करण्यात आलेल्या रस्त्यांची माहिती :
-म्हाळुंगे ते हिंजवडी फेज-१ दरम्यानचा १.५ किलोमीटर लांबीचा आणि ३६ मीटर रुंद रस्ता विकसित केला जाणार आहे. यासाठी १३.०५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
-ठाकर वस्ती ते माण गावठाण दरम्यानचा २.४० किलोमीटर लांबीचा आणि १८ मीटर रुंद रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी २०.८८ कोटी रुपये खर्च येणार आहे.
-सूर्या हॉस्पिटल ते ठाकर वस्ती दरम्यानचा ३.५ किलोमीटरचा रस्ताही विकसित केला जात असून, त्यासाठी ३०.४५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
या तिन्ही रस्त्यांच्या भूसंपादन प्रक्रियेला देखील गती देण्यात आली आहे. याशिवाय, रांजणगाव (शिरूर), पिरंगुट (मुळशी) यांसारख्या औद्योगिक भागातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी पीएमआरडीए विविध पातळ्यांवर काम करत आहे.







