पुणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. त्या केवळ नऊ वर्षाच्या असताना त्यांचा विवाह तेरा वर्षाच्या ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. ज्योतिरावांना लहानपणा पासूनच जातीयतेचे चटके बसले होते. सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या महिला शिक्षिका मानल्या जातात. सावित्रीबाई फुले यांची आज १९२ वी जयंती. यानिमित्ताने जाणून घेऊया देशातील पहिल्या शिक्षकाचे कार्य आणि जीवन.
अस्पृश्य, गोरगरीब, स्त्री वर्गाचे हाल पाहून ज्योतिरावांना खूप वाईट वाटत होते. याविरुद्ध समाजात आवाज उठविण्यासाठी त्यांनी स्त्री शिक्षणाचा मार्ग निवडला. सावित्रीनेही पतिचे कार्य यशस्वीपणे पुढे नेण्यासाठी ताकदीने पाऊल उचलले.
त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका म्हणून प्रसिद्ध झाल्या. स्वतः अनेक कविता लिहून समाज प्रबोधन केले. सावित्रीने फक्त स्त्रियांना शिकवण्याचे काम केले नाही. तर, त्यांनी समाज जागृतीचे महान कार्य केले.
सावित्रीबाई फक्त साक्षर होऊन थांबल्या नाहीत, तर वयाच्या सतराव्या वर्षी पुण्यासारख्या प्रस्थापित विचारांच्या आणि प्रतिगामी विचाराने बरबटलेल्या लोकांमध्ये शिक्षिका म्हणून भिडे वाड्यात मुलीना शिक्षण द्यायला लागल्या! ही अलौकिक घटना भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखी असून इथून पुढे भारताच्या संपूर्ण इतिहासानेच अक्षरशः कूस बदलली! एक स्त्री असून प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडावर पाय देऊन आपले ज्ञानदानाचे महान कार्य करतांना पाहून प्रस्थापितांचे डोळे दिपल्याशिवाय राहिले नाहीत
सावित्रीने स्वतः पतीकडून शिक्षण घेतले इसवीसन १८४८ रोजी पुणे येथील भिडे वाड्यात ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची पहिली शाळा काढली. याप्रसंगी त्यांना अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले. पण तरी सावित्री खचल्या नाहीत.
बालविवाहास आळा, विधवा पुनर्विवाह चालना, केशव पण बंदी व सती प्रथेस प्रत्यक्ष विरोध केला. बालहत्या प्रतिबंधक गृह उभारले. दुर्दैवाने १० मार्च १९९७ रोजी, वयाच्या ६६ व्या वर्षी प्लेग साथीत त्यांची प्राणज्योत मावळली.
सावित्रीबाई मुळे आज स्त्री मोकळ्या आकाशात स्वैर भरारी घेत आहे. तरीही आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात स्त्री वर्गाच्या समस्या दिसून येतात. त्या दूर झाल्या तरच खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंचे कार्य यशस्वीपणे पूर्ण झाले असे म्हणता येईल.
दरम्यान, सावित्रीबाईंच्या अमूल्य सामाजिक कार्यामुळे ३ जानेवारी हा दिवस “बालिका दिन” म्हणून भारतभर साजरा केला जातो. अशा या थोर सावित्रीबाई मुळे आज स्त्रिया शिकत आहेत. प्रत्येक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवत आहेत. स्त्री शिक्षणाची सावित्री, तूच खरी कैवारी, तुझ्यामुळेच शिकते आहे, आज प्रत्येक नारी. असे म्हणता येईल.