पुणे : प्रभात रस्त्यावरील हिरवाई उद्यान परिसरात दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेकडील मोबाईल फोन चोरून नेल्याची घटना घडली. नगर रस्त्यावरील वाघोली भागात दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील साडेतीन लाखांची सोनसाखळी चोरट्यांनी चोरून नेली, तर हडपसरमध्ये ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरण्याचा प्रयत्न केला.
वाघोली भागात दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील तीन लाख ३६ हजार रुपयांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत महिलेने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार दुचाकीस्वार महिला नगर रस्त्याने निघाल्या होत्या. उबाळेनगर परिसरात महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. महिलेने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार महिला प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १५ परिसरातील एका सोसायटीत राहायला आहेत. त्या बुधवारी सायंकाळी प्रभात रस्ता परिसरातील हिरवाई उद्यान परिसरात चालायला गेल्या होत्या. तेथून त्या घरी निघाल्या होत्या, त्यावेळी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर वहिनीने संपर्क साधला. मोबाईलवर संभाषण सुरू असताना गल्ली क्रमांक १५ परिसरातील सिंबायोसिस शाळेसमोर महिलेच्या हातातील २० हजारांचा मोबाईल चोरून दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. पोलिस उपनिरीक्षक वैजनाथ केदार तपास करत आहेत.
हडपसर भागातील मांजरी परिसरात पादचारी ज्येष्ठ महिलेची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठ महिलेने प्रसंगावधान राखून सोनसाखळी पकडल्याने चोरटे पसार झाले. तक्रारदार ६२ वर्षीय महिला उरुळी कांचन परिसरात राहायला आहेत. त्या बुधवारी सकाळी सातच्या सुमारास मांजरीतील इंद्रप्रस्थ लॉनसमोरून निघाल्या होत्या, त्यावेळी हा प्रकार घडला. या वेळी झालेल्या झटापटीत सोनसाखळीचा भाग तुटला.