पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आता राज्य महिला आयोग पुढे सरसावला आहे. राज्य महिला आयोगाकडून “महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यात तीन दिवसाच्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार येत्या मंगळवार ते गुरुवार या कालावधीत तक्रारींची जनसुनावणी होणार आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या जन सुनावणीत महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात असे आवाहन केले आहे. यामध्ये जिल्हास्तरावर जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या तीन दिवसाच्या दौऱ्यात शहरातील तक्रारींची सुनावणी मंगळवारी, तर पुणे ग्रामीणसाठी जनसुनावणी बुधवारी होणार आहे. या दोन्ही जन सुनावण्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनभवन येथे सकाळी 11 वाजता होणार आहेत. तर गुरुवारी पिंपरी चिंचवड महापालिका येथे सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे. या जनसुनावणीतून महिलांच्या तक्रारींना वाचा फोडण्यात येणार आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आणि सदस्य सचिव नंदिनी आवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या जनसुनावणीला जिल्हाधिकारी,महानगरपालिका आयुक्त, पोलीस प्रशासन आणि संबंधित विभागाचे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.