पुणे : राष्ट्र सेवा दलमध्ये शुक्रवारी (दि. 9) रोजी ‘निर्भय बनो’ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ झाला. कार्यक्रमावेळी महिला कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप शरद पवार गटाच्या महिलांनी केला. त्याची दखल राज्य महिला आयोगाकडून घेण्यात आली आहे. महिला आयोगाने ट्वीट करत पुणे पोलिसांना योग्य तपासकरून अहवाल सादर करण्याचे निर्देश यांनी दिले आहेत.
महिला कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याची घटना पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ‘काल पुण्यात पत्रकार निखिल वागळे यांच्या कार्यक्रमादरम्यान महिलांवर हल्ला झाल्याचे वृत्त माध्यमांद्वारे समोर आले आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून पर्वती पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाडयांच्याकडून कालच या घटनेची सविस्तर माहिती घेतली आहे. पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज, प्रथम दर्शनी जबाब तपासून योग्य ती कार्यवाही करत महिला आयोगाला अहवाल सादर करावा’ असे निर्देश पोलिसांना दिले आहेत.
काल पुण्यात पत्रकार निखिल वागळे यांच्या कार्यक्रमादरम्यान महिलांवर हल्ला झाल्याचे वृत्त माध्यमांद्वारे समोर आले आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून पर्वती पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड 1/3
— Maharashtra State Commission for Women (@Maha_MahilaAyog) February 10, 2024
निखिल वागळेंसह 250 जणांवर गुन्हा दाखल
पुण्यात निखील वागळेंच्या गाडीवर हल्ला झाला आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेल्या गोंधळाबद्दल पोलिसांनी गुन्हे दाखल केले. पहिला गुन्हा पत्रकार निखील वागळेंच्या गाडीवर हल्ला केल्याबद्दल भाजप आणि अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांसह पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पुतण्यावर दाखल केला. तर दुसरा गुन्हा कार्यक्रमाच्या ठिकाणी आंदोलन केल्याबद्दल महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांसह पत्रकार निखिल वागळेंवरदेखील दाखल करण्यात आला. पत्रकार निखील वागळेंच्या कार्यक्रमास परवानगी नसल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कार्यक्रमाच्या ठिकाणी बेकायदा जमाव जमवून आंदोलन केल्याबद्दल महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.