पुणे : एका महिलेने मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळून त्याची चाकू भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी पुण्यातील न-हे येथे घडली आहे.
किरपा बिप्त (वय 42, मूळ रा. नेपाळ) असे खून झालेल्या मद्यपी पतीचे नाव आहे. तर हिरा बिप्त (वय 46) असे आरोपी पत्नीचे नाव आहे. हिराला सिंहगड रस्ता पोलिसांनी रात्री अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, न-हे परिसरातील मानाजी नगर येथील स्वप्नपूर्ती रेसिडेन्सीमध्ये वॉचमन म्हणून हे पती-पत्नी दोघे राहत होते. किरप्पा हा दारू पिऊन वारंवार त्याच्या पत्नीला त्रास देत होता. रविवारी तो नेहमीप्रमाणे दारु पिऊन आल्यानंतर त्याचे पत्नीशी वाद झाले. त्यानंतर रागाच्या भरात पत्नीने त्याच्या पोटात चाकू भोसकून खून केला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच आरोपी पत्नी हिराला रात्री उशीरा अटक करण्यात आली. या हत्ये प्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.