पुणे : संक्रातीत पतंगबाजी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धोकादायक नायलाॅन मांजाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली असून नायलाॅन मांजाची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने मांजा विकणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून सोळाशे रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला आहे.
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात छुप्या पद्धतीने नायलॉन मांजा विकणारे सक्रिय झाले आहेत. नायलॉन मांजामुळे शरीराला इजा होते. त्यामुळे अशा मांजावर बंदी असून, विक्रेत्यांवर कारवाईचा इशारा पुणे पोलिसांनी दिला होता. युनिट-४ चे वरिष्ठ निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीत गस्तीवर असताना माहिती अंमलदार विनोद महाजन, नागेश सिंग कुवर यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून धानोरीत छापा टाकून अटक करण्यात आली आहे.
सदर महिलेकडून एक हजार ६०० रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला असून तिच्याविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे आणि पथकाने ही कामागिरी केली.
मांजामुळे अनेकांच्या जिवाला धोका
पुण्यात नायलॉन मांजा विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असून, यामध्ये नागरिकांबरोबर पक्षी देखील जखमी होत आहेत. मागील काही वर्षांत मांजामुळे गळा चिरून बऱ्याच जणांना जीव गमावण्याबरोबर अपंगत्व आल्याचीही उदाहरणे आहेत. गुरुवारी सकाळी दांडेकर पूल पानमळा परिसरात स्वाती अंगारे ह्या पतीसोबत नोकरीसाठी चालल्या असताना त्यांच्या दुचाकीच्या आरशाला नायलॉन मांजा येऊन अडकला. दैव बलवत्तर म्हणून त्यांचा अपघात होता होता वाचला. त्यानंतर त्यांनी रस्त्यावरील हा मांजा गोळा करून इतरांनाही वाचविले.