पिंपरी : येथे वाहतूक नियमन करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला तरुणांकडून मारहाण केली असल्याची घटना घडली आहे. पिंपरी कॅम्प परिसरातील शगुन चौकामध्ये ही घटना घडली. वाहतूक कोंडीत विना परवाना दुचाकी चालवणाऱ्या चालकावर कारवाई करताना दुचाकीस्वाराने वाद घातला. तसेच दुचाकी चालकाच्या मित्राने महिला पोलीस अधिकाऱ्याच्या कानाखाली मार देऊन तिथून पळून काढला. यावेळी पिंपरी पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्या दोघांना अटक केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.16) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निल धम्मपाल गाडे (वय-22) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यासह उमाकांत उर्फ महादू भगवान वाघमारे (वय-20) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिला सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अश्विनी सपकाळ यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अश्विनी सपकाळ या पिंपरी वाहतूक शाखेत नेमणुकीस आहेत.
या घटनेसंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सहायक पोलीस उपनिरीक्षक अश्विनी सपकाळ यांनी पिंपरी वाहतूक शाखेत सहायक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. रविवारी (दि.16) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी या शगुन चौकातील वाहतुक कोंडी कमी करण्याचे काम करत होते. त्यावेळी एका दुचाकीवरील (एमएच 14 जे झेड 9401) चालक विना परवाना गाडी चालवत होता. त्यामुळे फिर्यादी यांनी त्याच्यावर कारवाई केली. कारवाई केल्यामुळे त्या व्यक्तीला राग आल्याने दुचाकी चालकाने फिर्यादी यांच्यासोबत वाद घालून मी बघून घेईन, अशी धमकी देऊन निघून गेला.
फिर्यादी महिला सहायक पोलीस उपनिरीक्षक अश्विनी सपकाळ यांना धमकी दिल्यानंतर कारवाई केलेल्या मुलाचा मित्र महादु वाघमारे त्या महिलेजवळ आला. त्याने फिर्यादी यांच्या डाव्या कानावर जोरात कानाखाली मारुन तिथून पळून गेला. फिर्यादीच्या कानावर जोरात फटका बसल्याने त्या क्षणात गोंधळून गेल्या. त्याच दरम्यान आरोपी शगुन चौकांतील इलेक्ट्रीक दुकानांच्या गल्लीतून तिथून पळ काढला. यावेळी फिर्यादी त्या व्यक्तीचा पाठलाग केला मात्र तो व्यक्ती सापडला नाही.
या प्रकरणाबाबत फिर्यादी महिला सहायक पोलीस उपनिरीक्षक अश्विनी सपकाळ यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.