पुणे : पुण्यातील जीएसटी कार्यालयातील एका महिला अधिका-यास लाच घेताना ताब्यात घेण्यात आले आहे. वस्तू आणि सेवा कार्यालयातील (जीएसटी) राज्यकर अधिकारी महिलेला ३ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या घटनेमुळे जीएसटी कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
त्यावरून राज्यकर अधिकारी मालती रमेश कठाळे (वय ४३) यांच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यानंतर बुधवारी सायंकाळी वस्तू आणि सेवा कर कार्यालयात सापळा लावून कारवाई करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराने पत्नीच्या नावाने जीएसटी क्रमांक मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर केला होता. अर्ज राज्यकर अधिकारी मालती कठाळे यांच्याकडे प्रलंबित होता. त्यानंतर कठाळे यांनी तक्रारदार व्यावसायिकाशी संपर्क साधून त्याला जीएसटी कार्यालयात बोलावून घेतले. जीएसटी क्रमांक देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रार आल्यानंतर शहानिशा करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून कठाळे यांना ३ हजार रुपयांची लाच घेताना पकडले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नितीन जाधव आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत.