बारामती (पुणे) : बारामती शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सिनेमा रस्त्यावरील गंगासागर लॉजमध्ये एका महिलेच्या खूनाची घटना उघडकीस आली आहे. रेखा विनोद भोसले ( वय ३६, रा. सोनवडी, ता. दौंड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना ४ फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास घडली. तिच्यासोबत तिचा पती विनोद भोसले हा देखील या लॉज मध्ये पत्नी सोबत गेला होता.
तिचा खून करून पती फरार झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. धारदार हत्याराने हा खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून या संदर्भात पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिली.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पतीनेच हा खून केला असावा अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. हे पती- पत्नी गेल्या तीन वर्षांपासून विभक्त राहत होते. घटस्फोटाच्या कारणावरुन त्यांच्यात वाद होता. त्यातूनच पतीने हा प्रकार केला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान घटनेनंतर पती लॉजमधून पसार झाला आहे. दरम्यान महिलेचा मृतदेह शिवविच्छेदनासाठी सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे. पती ताब्यात घेतल्यानंतर खुनाचे खरे कारण समजू शकणार, अशी माहिती पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिली.