खेड : शेतात काम करताना अंगावर विज पडून महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना तिन्हेवाडी (ता. खेड) येथे मंगळवारी (ता. ४) घडली आहे. या घटनेमुळे नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात असून तिन्हेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. मंगल रंगनाथ आरूडे (वय-40) असे मृत्यु पावलेल्या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगल आरूडे व त्यांच्या दोन जाऊबाई तिन्हेवाडी – कोहिनकर वाडी गावांच्या हद्दीवर असलेल्या शेंडेवस्ती येथील शेतात भुईमुग काढायला गेल्या होत्या. मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. तेव्हा मंगल आरूडे यांच्या दोन जाऊबाई घरी जायला निघाल्या. तेव्हा दोघीजणी काही अंतरावर पुढे गेल्या.
दरम्यान, भुईमुग पाल्यावर झाकण टाकून मंगल निघाल्या असता त्यांच्या अंगावर विज कोसळली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, मुलगा मुलगी असा परिवार आहे. तर मंगल आरूडे यांच्या मृत्युने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.