कात्रज (पुणे): कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलावात शनिवारी १६ मार्च रोजी रात्री एका महिलेने तलावात उडी मारल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात अग्निशमन दलाला रात्री साडेबाराच्या वेळी माहिती मिळाली. त्यानंतर कात्रज अग्निशमन दलाच्या जवानांकडून आणि पोलिसांकडून तलावात बोटीच्या साहाय्याने दोन ते तीन तास शोध घेण्यात आला. परंतु, त्यावेळी महिलेचा मृतदेह मिळून आला नाही.
त्यामुळे अग्निशमन दलाकडून रविवारी सकाळी सात वाजल्यापासून शोध मोहीम सुरु करण्यात आली. या शोध मोहिमे दरम्यान संबंधित महिलेचा मृतदेह मिळून आला. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांकडून महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. सदर महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. तसेच मृतदेह पुढील तपासणीसाठी ससून रुग्णालयामध्ये पाठवला आहे.