लोणी काळभोर : घरी जाताना चुकीच्या रेल्वेत महिला चढली. मात्र, हे समजल्यानंतर ती खाली उतरताना पाय घसरून पडली. ही घटना लोणी (ता. हवेली) रेल्वे स्थानकात सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे.
मनीषा हेमचंद्र बनकर (अंदाजे वय-४०, टीसी कॉलेजच्या जवळ, बारामती) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्यावर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा बनकर या कामानिमित्त लोणी काळभोर येथील रामदरा रस्ता परिसरात राहत असलेल्या एका नातेवाईकाकडे आल्या होत्या. त्यांचे काम झाल्यानंतर मनीषा बनकर या पुन्हा घरी रेल्वेने चालल्या होत्या. लोणी रेल्वे स्थानकावर संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास आल्या होत्या.
दरम्यान, लोणी रेल्वे स्थानकात पुण्याकडून बारामती व बारामतीकडून पुण्याकडे जाणाऱ्या दोन्ही गाड्यांची स्पीकरवरून एकदाच माहिती देण्यात आली. दोन्हीही गाड्या काही अंतराच्या फरकाने फलाट क्रमांक १ वर येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, बारामतीकडून पुण्याकडे जाणारी गाडी सर्वात प्रथम आल्याने मनीषा बनकर यांचा गोंधळ झाला आणि त्या गाडीत बसल्या.
त्यानंतर मनीषा यांच्या लक्षात आले की, आपण बसलेली रेल्वे ही बारामतीच्या दिशेने नव्हे तर पुण्याच्या दिशेने चालली आहे. तेव्हा मात्र रेल्वे सुरु झाली होती. आपण चुकीच्या रेल्वेत बसल्यानंतर मनीषा यांनी तातडीने खाली उतरण्याच्या प्रयत्न केला. मात्र, रेल्वेतून उतरताना त्यांचा पाय घसरून त्या फलाटावर पडल्या.
या अपघातात मनीषा गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्या चेहऱ्याला गंभीर मार लागला आहे. त्यानंतर तेथील नागरिकांनी रुग्णवाहिलेला तत्काळ बोलाविले. त्यानंतर मनीषा यांच्यावर विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती स्थित असल्याची माहिती मिळत आहे.
गाड्यांच्या वेळेत दोन्ही फलाट रिकामे ठेवावेत
पुण्यापासून दौंड आणि दौंडकडून पुण्याकडे जाणाऱ्या सर्व गाड्या सेपरेट फलाटावर थांबतात. मात्र, लोणी स्टेशन असे एकमेव स्टेशन आहे की, या ठिकाणी दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या गाड्या एकाच फलाटावर येतात. यामुळे प्रवाशांचा गोधळ उडतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गाड्यांच्या वेळेत दोन्ही फलाट रिकामे ठेवावेत व गाड्या ज्या-त्याच दिशेच्या फलाटावर घ्याव्यात.
– अनिल शिंदे, लोणी रेल्वे प्रवासी संघटना